जांभळ्या आठवणी !


            रणरणत्या मे महिन्यात जीव लाहीलाही होत असतांना गावापासून लांब निघून जावं , हसणारा पळस तुमचा उष्मा घालवायला उभाच असेल, हळू हळू आणखी पुढे सरकाव... अन उंच हिरव्याकंच पानांनी बहरलेल्या झाडाच्या कुशीत शिरून निळी जांभळी झुंबरच झुंबर पाहून सारं-सारं विसरून जावं .
         उन्हा पूर्वी फुलणाऱ्या अन रणरणत्या उन्हात फळनाऱ्या ह्या जांभूळ झाडाखाली पाचोळाही गाधी बनून तयार असतो ! त्या पाचोळ्या गाधीवर अलगद पडलेली टपोरी जांभळ उचलावी , जिभेवर ठेवावी अन त्या आगळ्या-वेगळ्या स्वादानं.... माणसाचं हरवलेलं चैतन्य परत यावं ! किती मजेदार नाही ?
         पिकलं जांभूळ तोडू नकाsss .. म्हणतानाच मग एकदोन दगड भिरकावायची . आणखी जास्तीची जांभळ जमा झाली की , मग पळस पानांचा पुडा बांधायचा...अंगोपांगी फुलणारा पळस ह्या खेपेस पानं द्यायलाही कचरत असतो , पण त्याने हसून दिलेल्या चार-दोन पानांना जांभळाची चांगली मोठी पाने जोडायची... पुडा हात रूमलात बांधून मनगटाला लटकवायचा , आपला पंधरा शुद्ध रुमाल जांभळा होत असतांनाही किती सुखद वाटत नाही ? असं मस्त मजेदार चवी अन रंगासोबत... आपल्याच मस्तीत हरवून जायचं !
         जांभूळ ! टपोर ... गर्द जांभळा रंग ... हाताने कोरीव काम केलेलं आहे असं वाटावं अश्या कडा ... चकचकीत साल ... तिच्यात आपल प्रतिबिंबच जणू पहाव ! अगदी थोडे खाल्ले तरी पोट भरणार पण मन मात्र हटकून अतृप्त ठेवणार !! जांभूळाच जांभूळ हे नाव रंगावरून पडलाय की जांभूळामुळेच जांभळ्या रंगाचं नामकरण झालं ? याच अजूनही मला कोडचं आहे .
         जांभूळ पिकल्या झाडा खाली रणरणत्या मे ची एखाद-दोन दुपार गेली म्हणजे एखाद्या मोठ्या हिल स्टेशन वर आख्खा उन्हाळा घालवून आल्याचा आनंद मला व्हायचा .
         या जांभूळ आख्यानात सूर भरणारी भारती... जांभूळानं जांभळी झालेली जीभ , ययोयोsssss करून मला दाखवायची , आणि मी तिच्या सारखंच, ‘ तुझ्या पेक्षा माझी जीभ जास्त रंगली ’ म्हणत लहान मुलांसारखे जीभ बाहेर काढायचो . जांभूळाचं ते छोटसं गासोड घेऊन घराकडे परततांना तिच्यासोबत भावी आयुष्याचे गणित सोडवण्याच्या चवदार चर्चा करीत असू नांगरलेल्या शेतातून ढेकळ फोडत चालतांना आयुष्याच्या वाटेवरील प्रश्नांची ढेकळ विरघळून सुखाचे पिक फुलेल का ? असा प्रश्न डोळ्यात तरारून यायचा... घर कधी यायचं ते कधी कळायचंही नाही .
         पण नंतरचे उन्हाचे चटके त्या आठवणीत सुसह्य होऊन जायचे . जांभळासाठी भिरकावलेले दगड... दगड उचलून नेम धरतांना तिच्याशीही चालवलेली नेमबाजी .... अन पाचोळ्या गढीवर बसून तिच्याशी झालेल्या आनाबाका... सारं-सारं आठवत हसत हसत उन्हाळा निघून जायचा . पावसाचा हलकासा शिडकावा झाला... जूनच्या प्रारंभीही टोपल भरून जांभळ विकायला यायचे आणि मी पुन्हा ‘ ते ’ बघून  त्या आठवणीत हरवून जात असे .
         परवाच झालेल्या चक्री वादळानं जांभळाची झाड झोडपून काढल्याच वर्तमान पत्रातून वाचलं . ज्या झाडाखाली कधी जांभळा सडा पडायचा आज ती झाड चक्री वादळाच्या तडाख्यानं हिम्मत हरली असतील ! कच्या-हिरव्या-कोवळ्या जांभळानी  माना खाली टाकून मातीशी नातं सांगत मैत्री बांधली असेल एरवी मोहित करणारी कोकीळाही , कर्कश आवाजात रडत असेल आणि या जांभळावर दीड-दोन महिने घर चालवणारी सरस्वती आणि तिचा मुलगा पक्या... उर बडवून रडत बसले असतील . नक्कीच ! वर्तमान पत्रातल्या बातमीनं मला जांभळा भोवतीचं सारं चित्र डोळ्यासमोर उभं केलंय अन मी वेगळ्याच दुनियेत हरवून गेलो .
         आज ती रणरणती दुपार तर आहेच पण जांभळे खायला जायची सोय नाही अन असे जुळून आणले तरी जांभळ खात उन्हावर मात करून जीवनाचे गीत गाण्यासाठी ती नाही . खरतर आज ती (ती) नाही अन मी (मी) नाही ! जांभूळलेल्या दिवसांची आठवण एवढंच माझ्या हाती !! 
         गावाकडून आलेल्या एक स्नेह्याने सांगितलं आणि मी आणखीनच हरखून गेलो . चक्री वादळानं झोडपली गेलेली जांभळ उभी राहिलीही असती पुन्हा त्वेषाने... पण सदानंद जोशींनी रानातली पाचही जांभूळ झाड कापून आणलीयत म्हणे ! पर्यावरणा पासून लांब चाललेला माणूस एक एक करून हा झाड झाडोरा खाऊन टाकत असतांना कधीतरी कुणालातरी आम्ही अनुभवलेले जांभळे दिवस पुन्हा अनुभवायला मिळतील का ?

Comments

  1. Betway casino no deposit bonus codes - KT Hub
    Betway Casino no deposit bonus codes. We know 영천 출장안마 that 당진 출장안마 casinos are always offering this kind of bonus 광주 출장샵 codes, but 원주 출장마사지 it doesn't 부산광역 출장안마 make them a very appealing

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

माझे हरवलेले बालपण !!